Tuesday, September 22, 2009

बुद्धिबळासाठी आयुष्य वेचलेले भाऊसाहेब!


भाऊसाहेब पडसलगीकर यांचे नुकतेच निधन झाले. क्रीडा पत्रकारीता सुरु केल्यापासून नूतन बुद्धिबळ मंडळ, भाऊसाहेब पडसलगीकर आणि विविध स्पर्धांचे निकाल या गोष्टींशी दरवर्षी संबंध आला आणि काही वर्षांतच जणू काही ऋणानुबंधच जडला! भाऊसाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला. अगदी अलिकडे त्यांना भेटलो ते मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर यांच्या अकादमीच्या उद्‌घाटनाच्यावेळी.


वास्तविक एक डॉक्‍टर दुसऱ्या डॉक्‍टरविषयी (चांगले) बोलणे शक्‍य नसते. हल्ली "कोचिंग'चा "डिमांड' वाढल्यामुळे खेळाइतकीच प्रशिक्षणातही "चुरस' दिसून येते. स्वतः एक संयोजक, प्रशिक्षक असूनही भाऊसाहेब सांगलीहून पुण्याला आले आणि त्यांनी मृणालिनीला शुभेच्छा दिल्या. त्यांचे भाषणही औपचारीक नव्हते, तर ते मनापासून बोलले. यावरूनच त्यांना खेळाच्या विकासाची किती तळमळ होती, हे लक्षात आले.


या एका प्रसंगावरून भाऊसाहेबांच्या मनाचा मोठेपणा लक्षात येतो.भाऊसाहेब पडसलगीकर यांचा जन्म चार जुलै 1919 रोजी विंग (ता. कराड) येथे झाला. त्यांच्या घरात बुद्धिबळ चांगले रुजले होते. त्यांचे आजोबा, पणजोबा आणि वडील बुद्धिबळ खेळायचे. त्यांच्या घरातील प्रशस्त सोफ्यावर अनेक नामवंतांचे बुद्धिबळाचे डाव रंगले आहेत. त्यामुळे बुद्धिबळ भाऊसाहेबांना नवे नव्हते. अर्थात, त्यांनी या खेळाच्या आवडीला व्याप्त स्वरूप दिले. तसे करताना भाऊसाहेबांनी सांगली परिसरातीलच नव्हे, तर राज्यातील अनेकांच्या घराघरांत बुद्धिबळ पोचविले.


बुद्धिबळ खेळात काळाच्या ओघात अनेक बदल झाले. तांत्रिक आणि स्वरूप अशा दोन पातळ्यांवर होणाऱ्या बदलांचा भाऊसाहेबांनी सातत्याने आढावा घेतला आणि आपल्या प्रशिक्षणात त्यांचा समावेश केला. "बुद्धिबळ महोत्सवा'चे आयोजन हे भाऊसाहेबांचे मुख्य कार्य मानले जाते. मात्र, बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यापुरतेच मर्यादित कार्य त्यांनी केले नाही. याउलट "सायमल्टेनियस', "ब्लाइंडफोल्ड', अशा विविध नव्या प्रकारांच्या डावांची प्रात्यक्षिके त्यांनी महाराष्ट्रातील गावागावांमध्ये केली. त्यांचे हे कार्यसुद्धा महोत्सवाच्या आयोजनाइतकेच बहुमोल आहे.सांगली बुद्धिबळ महोत्सवामध्ये त्यांनी असंख्य स्पर्धांचे आयोजन केले. तसे करताना त्यांनी प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांना संधी मिळेल, याची दक्षता घेतली. या महोत्सवामुळे देशातील अनेक मातब्बर एकवेळ पुण्या-मुंबईत खेळलेले नसायचे, पण सांगलीला त्यांनी आवर्जून भेट दिलेली असायची.


यामुळे सांगली ही भाऊसाहेबांची कर्मभूमी असली तरी त्यांचे कार्यक्षेत्र देशव्यापी होते, असे म्हणणे अजिबात अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. महाराष्ट्राच्या अधिकाधिक मुलांनी हा खेळ खेळायला हवा, इतकेच नव्हे तर त्यांनी एलो गुणांकन कमवावे, विविध किताब मिळवावेत, अशी भाऊसाहेबांची तळमळ होती. महोत्सवाचे आयोजन करण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळे भाऊसाहेबांच्या प्रत्येक गोष्टीत काटेकोरपणा आणि शिस्त असायची. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य वेचते, असे म्हटले जाते. बुद्धिबळासाठी हे कार्य कुणी केले, या प्रश्‍नाचे उत्तर भाऊसाहेबांच्या रूपाने सापडते.

1 comment:

अमोल केळकर said...

भाऊसाहेबांविषयी एक अतीशय उत्तम लेख आपण लिहिला आहे.

माझ्या सुदैवाने लहानपणी शाळेत असताना 'नुतन बुध्दीबळ स्पर्धेत खेळण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे व्यक्तीमत्व जवळून पाहण्याची संधी मिळाली.

पटावरील ६४ घरावर अधिसत्ता मिळवून देणार्‍या महागुरुला ' मानाचा मुजरा '

आपला

अमोल केळकर