Tuesday, October 13, 2009

Monday, October 12, 2009

मनस्वी मीनल!


मीनल ठाकूरने आग्रा येथील राष्ट्रीय स्पर्धेत बिलियर्डस आणि स्नूकर अशा दोन्ही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. याआधी ती पूलमध्येही विजेती ठरली होती. "अकाउंट्‌स'चे चार ठिकाणी काम करीत "क्‍यू स्पोर्टस'मध्ये कारकीर्द घडवीत असलेल्या मीनलने आतापर्यंत स्वबळावर वाटचाल केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील यशानंतर आता तिच्याकडून जागतिक यशाची प्रतीक्षा आहे. तिच्याशी साधलेला संवाद.

मुकुंद पोतदार

कोणत्याही खेळात दोन बहिणी, दोन भाऊ, वडील-मुलगा, वडील-मुलगी अशा जोड्या असतील तर तुलनेला ऊत येत असतो. ही तुलना तज्ज्ञच नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकही करीत असतात. खेळाडूंना कितीही नको असले तरी या तुलनेने सामोरे जावे लागतेच. त्यातही संगणकाच्या वापरामुळे काही सेकंदांमध्ये तमाम लेखा-जोखा समोर येतो. अर्थात खेळाडूंची इच्छा नसली तरी त्यांना अशा "तौलनिक भडिमारा'च्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागत असते. मुंबईची बिलियर्डसपटू मीनल ठाकूर हिचे काहीसे असेच झाले असावे. लहान बहीण अनुजा आणि ती दोघी "क्‍यू स्पोर्टस' आवडीने खेळायच्या. पण साडेतीन वर्षांनी लहान असलेल्या अनुजाला आधी यश मिळाले. अनुजा आधी राष्ट्रीय, तसेच जागतिक विजेतीही झाली. साऱ्या जगाला अनुजाचे यश दिसायचे, पण योग्य वेळी पुरस्कर्ते मिळाल्यामुळे तिची वाटचाल सुकर झाली होती, याची फार थोड्या जणांना कल्पना होती. मीनलचे यश कुणाला दिसत नव्हते, कारण ते तिला मिळत नव्हते, पण म्हणून ती मेहनतीत कुठेही कमी पडत नव्हती, फक्त तिला साथ नव्हती ती योग्य पुरस्काराची आणि किंचितच परंतु अनिवार्य अशा दैवाची...

आग्रा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मात्र मीनलने बिलियर्डस आणि स्नूकरमध्येही विजेतेपद मिळविले. आर्थिक पुरस्काराच्या आघाडीवर निराशाजनक चित्र असूनही मीनलने हार मानली नाही.

मीनल "क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया'च्या (सीसीआय) "सोसायटी'सह चार ठिकाणी "अकाउंट्‌स'चे काम करते. संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता ही कामे संपवून ती धावतपळत हिंदू जिमखान्यावर जाते आणि तेथे सराव करते. तिने कोलकत्यात गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या राष्ट्रीय एट-बॉल पूल स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. मीनलचे ते पूलमधील पहिले राष्ट्रीय विजेतेपद होते. मीनलने 2004 मध्ये स्नूकरचे, तर 2006 मध्ये बिलियर्डसचे राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. पूल, बिलियर्डस आणि स्नूकर अशा तिन्ही प्रकारांमध्ये राष्ट्रीय विजेती असलेली ती एकमेव महिला खेळाडू आहे. पुरुषांमध्ये देवेंद्र जोशी आणि अलोक कुमार यांनाच असे "तिहेरी' यश मिळविता आले आहे. या यादीत गीत सेठी, पंकज अडवानी किंवा अनुजा ठाकूर यांचा समावेश नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. अर्थात म्हणून या जगज्जेत्यांनी सर्वोच्च पातळीवर संपादन केलेल्या यशाचे मोलही कमी होत नाही, याचाही उल्लेख करावा लागेल.

आग्रा येथील घवघवीत यशानंतर मीनलशी संपर्क साधला. मीनलकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोनही आता बदलला आहे. तिचा अनुजाशी उपांत्य सामना सुरू असताना पंकज अडवानी उपस्थित होता. मीनलने अत्यंत अवघड "पॉटिंग' केल्यानंतर तो चकित झाला. ""अनेक पुरुष खेळाडू सुद्धा इतक्‍या अवघड "अँगल'मधून "पॉटिंग'चे धाडस करीत नाहीत, अशी प्रतिक्रिया पंकजने नंतर व्यक्त केली,'' असे मीनलने सांगितले.

""अर्थार्जनासाठी चार ठिकाणी काम करावे लागणे, आर्थिक पुरस्कार नसणे, अशा वेळी सराव कसा केला,'' या प्रश्‍नावर मीनल म्हणाली, ""सकाळी दहा ते सहा अशा नोकरीमुळे मला इच्छा असूनही "क्‍यू स्पोर्टस'साठी झोकून देता येत नाही. जेमतेम तास-दीड तास मी सराव करू शकते. हिंदू जिमखान्यात मी ध्रुव सीतवाला, देवेंद्र जोशी, नंदू शहा, सिद्धार्थ पारिख यांच्याबरोबर सराव करते. आर्थिक पुरस्कार नसल्यामुळे मला प्रशिक्षणही घेता येत नाही. दिवंगत विल्सन जोन्स यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी जे काही शिकविले, त्यावरच माझी वाटचाल सुरू आहे.''

मीनलने राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पातळीवरही गुणवत्तेची चुणूक दाखविली होती. 2006 मध्ये केंब्रिजमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने इंग्लंडच्या क्रिस्टिना शार्प हिच्या साथीत अंतिम फेरी गाठली होती. त्याच वर्षी दोहा आशियायी क्रीडा स्पर्धेत "नाईन बॉल पूल'मध्ये तिचे पदक एका फेरीने हुकले होते.

आगामी उद्दिष्टांविषयी मीनल म्हणाली, ""28 ऑक्‍टोबरपासून आशियायी इनडोअर स्पर्धा होणार आहे. याशिवाय हैदराबादला जागतिक महिला स्नूकर स्पर्धा होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे माझा आत्मविश्‍वास उंचावला आहे. आता एक टप्पा पुढे जात जागतिक दर्जाची कामगिरी करायची आहे.''

""अनुजाचे यश, तिच्याशी होणारा तुलना, याचे काही दडपण आले होते का,'" यावर मीनल शांतपणे म्हणाली, ""तिला आधी आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे तिची कामगिरी झाली. मी अजूनही मदतीची प्रतीक्षा करताना प्रयत्न सुरू ठेवत आहे. दुहेरी यशानंतर परिस्थिती बदलेल, अशी माझी आशा आहे.'' "अनुजाची मोठी बहीण' या छायेतून मीनल आता खऱ्या अर्थाने बाहेर पडली आहे. आता तिने खेळात "ताईगिरी' करावी हीच सदिच्छा आणि शुभेच्छा!

ब्रीजच्या रूपाने वरदान!

मीनलशी गप्पा मारताना एक वेगळीच माहिती मिळाली. तिला ब्रीजची प्रचंड हौस आहे. ती "ऑनलाइन' ब्रीज खेळते. अनेकदा तिचा जोडीदार असतो गीत सेठी! याविषयी मीनल म्हणाली, ""ब्रीजसाठी खूप एकाग्रता लागते. बिलियर्डससाठीही हा गुण आवश्‍यक असतो. ब्रीजमुळे तो जोपासता येतो. गीत सेठी म्हणूनच ब्रीज खेळतो. ब्रीज मला वरदानच ठरले आहे. नॉर्वेचे रॉजर मेडबाय हे सुद्धा "ऑनलाइन' असतात. पुण्याच्या सुबोध गुर्जर यांच्यामुळे त्यांची "इ-ओळख' झाली. मेडबाय चित्रकार, छायाचित्रकार, तत्त्वज्ञ, असे बरेच काही आहेत. त्यांच्याशी "चॅटिंग' करताना मला बहुमोल "टिप्स' मिळाल्या. अशाप्रकारे ब्रीज माझ्यासाठी वरदानच ठरले आहे.''