Monday, February 9, 2009

मेंडीस "ढेर', भारत "शेर'!

मेंडीस "ढेर', भारत "शेर'!


ऐनवेळी ठरलेल्या श्रीलंका दौऱ्यात पूर्वनियोजित डावपेचांच्या जोरावर वन-डे मालिका जिंकून "धोनीच्या धुरंधरां'नी यशोमालिका कायम राखली. युवराज, सेहवाग, गंभीर या अनुभवी खेळाडूंच्या जोडीला काही नवोदितांनी ठसा उमटवला.प्रतीस्पर्धी संघातील एखाद्या खेळाडूने पूर्वी धक्के दिले असले तरी पुन्हा त्याच्याविरुद्ध उभे ठाकताना भारतीय फलंदाज डगमगून कच खात नाहीत, हे सुद्धा या मालिकेतून दिसून आले.

मुकुंद
पोतदार

उपखंडात "शेर', परदेशात "ढेर'! भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि श्रीलंका या इतर दोन संघांवरही अशी टीका होत असते. हे तीन संघ उपखंडातच आणि त्यातही मायदेशात भरात असतात, परदेशात गेल्यानंतर मात्र त्यांना विजय मिळविता येत नाहीत, असे "रेकॉर्ड'च सांगते. पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली, तर भारताने सौरभ गांगुली कर्णधार असताना परदेशात भरीव कामगिरी केली. हे अपवाद सोडल्यास उपखंडातील संघांना परदेशात हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच यश मिळाले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका या तीन संघांची शेजारच्या देशांमधील कामगिरी सुद्धा फारशी प्रभावी नाही. भारतात कसोटी मालिका जिंकण्यासाठी पाकिस्तानला 1987 पर्यंत वाट पाहावी लागली, तर पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला 2001 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. कोणत्याही देशाविरुद्ध त्यांच्या देशात खेळणे अवघडच असते. त्यातही श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात खेळताना अनेक मातब्बर संघ पराभूत झाल्याचे दिसून येते. अशावेळी श्रीलंका दौऱ्यात भारताने सलग दुसऱ्यांदा वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंचा संघ एकमेकांविरुद्ध खेळत असतो. असे असले तरी प्रत्यक्षात दोन-तीन प्रमुख खेळाडूंमध्ये निर्णायक लढत असते. प्रमुख खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलायचा आणि इतरांनी खारीचा वाटा उचलून त्यांना साथ द्यायची असते. यालाच "टीम गेम' अर्थात सांघिक कामगिरी म्हणतात. प्रमुख खेळाडू ढेपाळले तर संघाला मोठा धक्का बसू शकतो. एखादा संघ गोलंदाजीत प्रबळ असेल तर ती त्यांची जमेची बाजू असते. गोलंदाजीच्या जोरावर प्रतीस्पर्धी संघाच्या फलंदाजांची कोंडी करण्याचे डावपेच लढविले जातात.मेंडीस विरुद्ध भारताचे "स्ट्रोकप्लेयर'यासंदर्भात या मालिकेपूर्वी सर्वांची चर्चा एकाच खेळाडूविषयी होत होती. एक नाव बरेच गाजत होते आणि ते होते अजंता मेंडीसचे. वास्तविक मुथय्या मुरलीधरन हा श्रीलंकेचे "ट्रंप कार्ड' आहे. पण मेंडीस हाच त्यांचा "स्ट्राईक बोलर' बनला आहे. वास्तविक मेंडीसला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. मात्र मागील वर्षी आशिया करंडक स्पर्धेत तसेच श्रीलंका दौऱ्यात त्याची गोलंदाजी खेळताना भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. वास्तविक भारतीय गोलंदाज मायदेशातील फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी सहज खेळून काढण्यात तरबेज असतात. भारतीय फलंदाजांनी शेन वॉर्न याच्यासारख्या मातब्बर लेगस्पीनरला क्वचित डोके वर काढू दिले. अशावेळी एखादा नवखा फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांची कोंडी करतो, याचे कोडे सर्वांनाच चक्रावून टाकणारे होते. भारताच्या भल्याभल्या "स्ट्रोकप्लेयर'ना मेंडीसच्या चेंडूंचा अंदाजच आला नाही आणि त्यांची दांडी गुल झाली.या पार्श्‍वभूमीवर मेंडीस विरुद्ध भारताचे "स्ट्रोकप्लेयर' असाच या मालिकेतील निर्णायक मुकाबला होता. जेव्हा एखाद्या संघाचे "ट्रंप कार्ड' भरात असते, तेव्हा त्याचे अस्त्र प्रतीस्पर्धी संघ कसे परतावून लावतो, यावर मालिकेचा निकाल अवलंबून असतो. भारतीय फलंदाजांनी या आघाडीवर बराच "होमवर्क' केल्याचे दिसून आले. मागील मालिकेत युवराजला मेंडीसने तीन वेळा बाद केले होते. युवराज केवळ 72 धावा करू शकला होता. त्या मालिकेतील अपयशानंतरच त्याची संघातून गच्छंती झाली होती. मात्र युवराजने नेटमध्ये कठोर मेहनत केली. याशिवाय त्याने "जिम'मध्ये जाऊन वजनही कमी केले. इंग्लंडविरुद्ध त्याने धडाकेबाज पुनरागमन केले. मात्र तेव्हा तो मायदेशातील "पाटा' खेळपट्ट्यांवर खेळत होता. यावेळी मेंडीसविरुद्ध त्याच्याच "गुहे'त शिरून विजयाचा घास घ्यायचा होता. साहजिकच युवराजच नव्हे तर सर्वच भारतीय फलंदाजांची कसोटी होती.पाकिस्तानचा दौरा रद्द झाल्यामुळे श्रीलंकेचा दौरा ऐनवेळी ठरविण्यात आला होता. असे असले तरी एकदा लंकेला जायचे ठरल्यानंतर "टीम इंडिया'ने अजंता मेंडिसनामक "भूत' गाडायचा निर्धार केला आणि त्यादृष्टिने नियोजन केले. मेंडीसच्या शैली आणि तंत्राचे "पोस्टमार्टेम' करण्यात आले. त्यातून "मार्गदर्शक तत्त्वे' आखण्यात आली. पहिली गोष्ट म्हणजे मेंडीस हा फिरकी गोलंदाज असला तरी तो मध्यमगती गोलंदाज आहे, असे समजून त्याचा मारा खेळायचे ठरले. "फ्रंट फूट' तिरक्‍या रेषेत न नेता सरळ टाकायचे ठरले. फिरकी गोलंदाजाचे चेंडू तटविण्यासाठी अनेकदा पॅडचा वापर केला जातो. क्रिकेटच्या परिभाषेत त्यास "पॅडिंग' करणे असे म्हटले जाते. मात्र "पॅडिंग' चुकले की, फलंदाज पायचीत होत असतात. फिरकी गोलंदाजीविरुद्ध असेच चकण्याचा धोका असतो. अशावेळी "पॅड'चा वापरच करायचा नाही, "बॅट'नेच खेळायचे ठरले.सचिनच्या अनुभवाचा फायदाएखाद्या संघाच्या धोरणात्मक नियोजनात प्रमुख खेळाडू आपला विपुल अनुभव कसा "अप्लाय' करतात, त्यासाठी किती पुढाकार घेतात आणि काय युक्‍त्या लढवितात, हे महत्त्वाचे असते. मागील मालिकेत सचिन तेंडुलकर खेळू शकला नव्हता. यावेळी त्याची उपस्थिती निर्णायक ठरली. खरे तर तिन्ही वेळा सचिनला पंचांनी "बाद' केले. तरीही सचिनचा नुसता सहभाग संघासाठी प्रेरणादायी ठरला. तिसऱ्या सामन्यात घणाघाती शतक झळकाविल्यानंतर युवराजने सचिनला मानवंदना दिली. नंतर मेंडीसचे अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी सचिनच्या "टिप्स' उपयुक्त ठरल्याचेही युवराजने कृतज्ञतापूर्वक नमूद केले. यावरून सचिनचा अनुभव किती बहुमोल आहे, हे स्पष्ट होते.तिसऱ्या सामन्यात युवराजचा धडाका सुरू असताना वीरेंद्र सेहवाग "नॉन-स्ट्राईक'ला होता. सेहवागच्या वाट्याला फार कमी चेंडू येत होते. गोलंदाजीवर एकहाती हुकूमत राखण्याची सवय असलेल्या आक्रमक फलंदाजांना अशावेळी संयम राखणे फार अवघड जाते. मोठ्या "ब्रेक'नंतर "स्ट्राईक' मिळाल्यास या फलंदाजांची एकाग्रता ढळते आणि ते बाद होतात, असे दिसून येते. या संदर्भात सेहवागनेही "युवी'च्या जोडीला झळकाविलेले शतक कौतुकास्पद ठरते.गंभीरचे सातत्यभारतीय संघात अनेक शैलीदार फलंदाज आहेत. सचिन, सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्या तुलनेत गंभीरला तेवढा "करिष्मा' नाही. मात्र गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून गंभीरने राखलेले सातत्य अतुलनीय आहे. या मालिकेतही त्याने एका दिडशतकासह सुमारे पावणेतीनशे धावा काढल्या. "मिस्टर डीपेंडेबल' असा लौकिक गंभीर निर्माण करीत आहे आणि तो टिकवीत सुद्धा आहे!इशांत, प्रविणची चमकयावेळी सचिन उपलब्ध असला तरी प्रमुख फिरकी गोलंदाज हरभजनसिंग तंदुरुस्त नव्हता. हरभजनला पुन्हा फॉर्म गवसला आहेच. याशिवाय "आयपीएल'मध्ये एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावलेल्या "भडकू भज्जी'ने स्वतःच्या वर्तनातही सुधारणा केली आहे. हरभजन नसल्यामुळे वेगवान गोलंदाजांवर मदार होती. कारकिर्दीत सर्वाधिक भरात असलेल्या झहीरला तीन सामन्यांत तीनच बळी मिळाले. मात्र इशांत शर्माने पाच सामन्यांत दहा बळी टिपले. प्रवीण कुमार याने पाच बळी मिळविले. इरफान पठाण यानेही उपयुक्त कामगिरी केली. संघाचा "अविभाज्य घटक' म्हणून इरफानला स्वतःचे स्थान पुन्हा भक्कम करायचे आहे. यावेळी गोलंदाजीत त्याची कामगिरी दिलासा देणारी ठरली.नवोदितांचा ठसाया दौऱ्यात काही नवोदितांना भारताने संधी दिली होती. कोणत्याही संघाची "दुसरी फळी' किंवा "बेंच स्ट्रेंथ' भक्कम असावी लागते. त्यामुळे काही नवोदितांच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष्य होते. अनिल कुंबळेची निवृत्ती, हरभजनची अनुपलब्धता असे असताना प्रग्यान ओझा हा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. त्याने चार सामन्यांत सात बळी मिळवून प्रभावी कामगिरी केली. रणजी मोसमात सौराष्ट्राने भरीव कामगिरी केली. यात रवींद्र जडेजा याचा मोलाचा वाटा होता. ओझाप्रमाणेच जडेजानेही "आयपीएल'द्वारे लक्ष्य वेधून घेतले होते. जडेजाला एकाच सामन्यात संधी मिळाली आणि त्याचा फायदा उठवीत त्याने अर्धशतकी खेळी केली. या तुलनेत सुरेश रैना (पाच सामन्यांत एकाच अर्धशतकासह 141 धावा) आणि रोहित शर्मा (तीन सामन्यांत 44) यांना संधीचा फायदा उठविता आला नाही."पूर्वपुण्याई नही चलेंगी'!"एक शतक काढा आणि पंचवार्षिक योजनेप्रमाणे पाच वर्षे निश्‍चींत राहा' असे भारतीय क्रिकेटचे "अलिखित समीकरण' होते. मात्र आता "पूर्वपुण्याई'च्या जोरावर कुणालाही संघातील स्थान अबाधित राखता येत नाही. संघातील प्रत्येक स्थानासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अशावेळी एखाद्या सामन्यातील अपयश संघातील स्थान जाण्यास काणीभूत ठरू शकते. संघाची कामगिरी म्हणूनच उंचावली आहे.धोनीचे नेतृत्वसौरभ गांगुलीने "जशास तसे' या नीतीच्या जोरावर आक्रमक नेतृत्व करून "टीम इंडिया'च्या यशाचा पाया रचला. आता धोनीच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली "टीम इंडिया' आणखी बहरली आहे. श्रीलंकेतील कामगिरीचे अजित वाडेकर, अंशुमन गायकवाड, संदीप पाटील, मदन लाल अशा खेळाडूंनी कौतुक केले आहे. भारताच्या माजी कसोटीपटूंनी दिलेली शाबासकी "धोनीच्या धुरंधरां'साठी महत्त्वाची आहेच. मात्र अर्जुन रणतुंगा, इयन चॅपेल, शेन वॉर्न अशा इतर देशांच्या माजी कसोटीपटूंनी धोनीच्या नेतृत्वगुणांना "सर्टिफिकेट' दिले आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे. याचे कारण प्रतीस्पर्धी देशाचे तज्ज्ञ दुसऱ्या संघांचे कौतुक असे सहजासहजी करीत नसतात.आता लक्ष्य "किवी'सुरवातीलाच उल्लेख केल्या त्याप्रमाणे परदेशात "ढेर' हा कलंक पुसून काढणे भारतीय संघाला आवश्‍यक आहे. "नंबर वन' बनण्यासाठी भारताला परदेशात प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळविणे अनिवार्य आहे. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळविण्याचे ध्येय "टीम इंडिया'ला आखून दिले आहे. ही वाटचाल लवकरच सुरू होणार असून न्यूझीलंड दौरा जवळ आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात न्यूझीलंडला कसोटी मालिकेत पराभूत व्हावे लागले, मात्र वन-डेमध्ये "किवी' कांगारूंना भारी पडले.-----