सहा वर्षांपूर्वी आम्ही मित्र-मित्र काश्मीरला गेलो होतो. तेव्हा पहलगाम, श्रीनगर आणि गुलमर्ग अशी तीनच ठिकाणे पाहिली होती आणि येताना वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.
पहलगामहून परत येताना एका जवानाशी गप्पा मारल्या. "मराठा लाईट इन्फंट्री'चा हा जवान मुळचा बेळगावी, पण मराठी होता. तो अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तासाठी आला होता. तेव्हा यात्रा सुरू व्हायची होती. त्याने यात्रेविषयी बरीच माहिती दिली. प्रत्यक्ष चालायला जेथून सुरवात होते, त्या चंदनवाडीला जाणारा मार्गही त्याने दाखविला. अमरनाथ यात्रेविषयी टीव्हीवर बरेच काही पाहिली होते, तसेच वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती. तेव्हापासून अमरनाथला जायचे मनात होते.
हा योग अखेर यावर्षी आला. किंवा आणला असा म्हणावे लागेल.पहलगामहून चढाई करायची आणि बालतालमार्गे उतरायचे असा "रूट' निश्चीत केला.
पहलगामहून पिस्सूटॉप हा पहिलाच मार्ग फार खडतर असतो. त्यासाठी प्रचंड तंदुरुस्ती लागते. पुण्यात अगदी दूध आणण्यासाठी "बाईक'वरून जाणाऱ्यांमध्ये माझा समावेश असल्यामुळे पहिल्याच टप्याला धापा टाकाव्या लागल्या. अखेर "सॅक' "पिठ्ठू'ला दिली. हा पिठ्ठू म्हणजे "भारवाहक काश्मीर कुमार'. यात्रेच्या काळात असे अनेक छोकरे वर्षभराची कमाई करीत असतात. हा पिठ्ठू अत्यंत चपळ गटात मोडणारा होता, तर मी चालून-चढून मोडलो होतो. पण पहिला टप्पा "भाररहित' अवस्थेत असताना सुद्धा पूर्ण करताना दमछाक झाली.
अखेर जोजपालला पोचलो. तेथे लंगरमध्ये थोडेफार खाल्ले. बरीच दमछाक झाल्यामुळे शेषनागचा पहिला टप्पा गाठणे अशक्य होते. त्यामुळे जोजपालच्या लंगरप्रमुखाची भेट घेऊन त्याला मुक्काम करू देण्याची विनंती केली. त्याने "अनुमती' दिली. ती रात्र तेथेच काढली.
सोलापूरची थंडी, मुंबईचा पावसाळा आणि ऊन्हाळा पचवला असला तरी त्या रात्री काश्मीरी थंडीने गारठून गेलो. पण सकाळी उठलो तेव्हा ताजातवाना झालो होतो. पुण्याहून निघाल्यापासून दोन दिवस अंघोळ केली नव्हती. त्यामुळे थंडगार-अल्हाददायक हवामान असूनही "चिक-चिक' होत होते.
अखेर मनाचा प्रचंड निर्धार करून बर्फाच्या वितळलेल्या पाण्याने अंघोळ केली!मग मागचा-पुढचा विचार न करता थेट घोडा केला. मार्ग फार खडतर असल्यामुळे त्याशिवाय पर्यायच नव्हता. मग माझ्या यात्रेला वेग आला. शेषनागचे अप्रतिम "झील' पाहून फार छान वाटले.
महागुनस्टॉप-पंचतर्णी असे करत "गुफा' गाठली. शेवटच्या टप्यापाशी गेल्यानंतर सुद्धा सुमारे शंभर-दोनशे पायऱ्या आहेत. यंदा प्रचंड बर्फ पडला असल्यामुळे सुमारे दहा फुट उंचीचे शिवलिंग तयार झाले होते. इतके भव्य शिवलींग पाहून धन्य झालो. सुमारे तीन वर्षांपूर्वी "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे शिवलिंग जेमतेम तयार झाले होते. यावेळी मात्र ज्यांनी यात्रा केली ते भाग्यवान ठरले. कारण इतके उंच शिवलिंग अलिकडच्या वर्षांत प्रथमच तयार झाले होते!
1 comment:
अमरनाथ यात्रेचे सचित्र दर्शन घडवणारे फोटो पाहिले. प्रत्येक टप्प्यावरील फोटो असल्याने जणू काही लेखाबरोबर आपणही अमरनाथ यात्रा करतो आहोत, असे वाटते. किमान छायािचत्रेपाहून तरी तेथे गेल्याचा अनुभव मिळतो. छान.
शेखर
Post a Comment