Saturday, September 19, 2009

अरेच्चा, "चॅटींग'ला च्याट मारायची राहीलीच की....


कलीच्या अवकृपेमुळे उदयास आलेल्या "संवाद' (??????????????) साधनांवर आता बहुतेक काही खंडांचा ग्रंथच होईल असे दिसतेय. पहिल्या अध्यायानंतर आता दुसरा अध्याय सुचला आहे. किंवा फार तर पहिल्या अध्यायात काही भार घालता येईल, असे वाटले आहे. त्यामुळे दुसऱ्या अध्यायाची भर घालण्यासाठी हा "ब्लॉगप्रपंच'!!!!!!!!!

खंड, ग्रंथ असे संकेत देताना किंवा सुतोवाच करताना एकता कपूरच्या "के' सिरीजमधील सिरीयलप्रमाणे अनंत (इन्फीनीटी) भागांचा मारा करण्याचा उद्देश नाही, हे सुरवातीलाच नमूद करतो.पेजर ते ट्‌वीटर या मालिकेत "चॅटिंग' हे अजूनही बरेच लोकप्रिय असलेले "संवाद माध्यम' आहे. पूर्वी "चॅटिंग'बाबत लोक अनभिज्ञ होते. मात्र नंतर अगदी चोर, भामटे, स्त्रीलंपट अशी सर्वच मंडळी "चॅटिंग किंग' बनली. चॅटींगच्या माध्यमातून जुळलेले अनेक विवाह मोडकळीस आले.

गंधर्व विवाह, प्रेम विवाह, राक्षस विवाह, असे काही विवाहाचे प्रकार असतात, असे मी समाजशास्त्राच्या पुस्तकात वाचले होते. मात्र "चॅटिंग' विवाह असा नवा पायंड कलीने निर्माण केला आणि विवाहसंस्थेत भर पडली.

काचा विकण्या, बसवण्याचा (फोडण्याचा नव्हे!!!!!!!!) धंदा करणारे आमचे एक मित्र आहेत. त्यांच्या एका मैत्रीणीचे याच माध्यमातून लग्न ठरले होते. मात्र "चॅटींग' करणारा प्रत्यक्षात "चाटू' असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने नकार दिला, मात्र त्या हरामखोर चाटूने तिच्यावर अत्याचार केले.

चोर धावण्यात म्हणजे चोरी करून पळून जाण्यात तरबेज असतात. भारतातील असे अनेक चोर मिळाल्यास आणि त्यांच्यावर चांगले संस्कार (!) केल्यास-म्हणजे त्यांना चायनावाल्यांप्रमाणे "ट्रेनिंग' दिल्यास भारत ऍथलेटिक्‍समध्ये सुवर्णपदकांची लयलुट केल्याशिवाय राहणार नाही, असे आमच्यातील (क्रीडातज्ञ पी. मुकुंद) आम्हास मनातल्या मनात सांगतो आहे.

असो...तर हे स्वगत थांबवितो आणि आता तुमच्याशी संवाद साधतो. तर मुद्दा असा की, आता "चॅटिंग' करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे, गळ्यात फास टाकून घेणे, हातात तुरी घेण्यासारखे झाले आहे. "चॅटिंग' करणे म्हणजे कुणाच्या तरी जाळ्यात फसणे असे होण्याचा जास्त डेंजर असतो. त्यामुळे चॅटिंगद्वारे चाटूगिरी किंवा चेटूक करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कलीने निर्माण केलेल्या अत्याधुनिक संवाद साधनांमध्ये चॅटिंग हा प्रकार लै म्हणजे लै म्हणजे लै म्हणजे लै डेंजरस वाटतो.

No comments: