Sunday, August 12, 2007

News Published in Sakal on 11th August, 2007

चक दे'फेम मुलींचा
खऱ्या खेळाडूंशी सामना!

मुंबई, ता. 10 (पीटीआय) ः "चक दे इंडिया' चित्रपटात महिला हॉकीपटूंची भूमिका केलेल्या मुली आणि भारताच्या खऱ्याखुऱ्या महिला हॉकी संघातील खेळाडू यांच्यात एक प्रदर्शनी सामना आयोजित करण्याचा विचार असल्याचे भारताचे माजी गोलरक्षक मीररंजन नेगी यांनी सांगितले.त्यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेला "चक दे' आज प्रदर्शित झाला.

चित्रपटात मुख्य भूमिका असलेला शाहरुख खान, तसेच महिला हॉकीपटूंची भूमिका केलेल्या मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले. याविषयी ते म्हणाले की, ""लवकरच असा सामना घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी कलाकारांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली तेव्हा त्यांना हॉकीविषयीच नव्हे तर मैदानावर साधे धावण्याविषयीसुद्धा कल्पना नव्हती. मात्र "चक दे' पाहिल्यानंतर या मुलींनी हॉकी किती छान आत्मसात केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यांनी हा चमत्कार कसा केला याचे आश्‍चर्य वाटते. या मुली हॉकी खरोखरच चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या मुली आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना नक्कीच चांगली लढत देऊ शकतील. प्रदर्शनी सामन्यातही त्यांना मान खाली घालावी लागणार नाही. त्यामुळेच मी हा सामना आयोजित करण्यासाठी गांभीर्याने विचार करतो आहे.'

मुलींच्या संघाने पुरुष संघाविरुद्ध सामना खेळल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील मुली मणीपूर, दिल्ली, पंजाब, उत्तरांचल, महाराष्ट्र, अशा ठिकाणी राहणाऱ्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच खऱ्या खेळाडूंना सवलती मिळतील आणि हॉकीत पुन्हा यशोमालिका सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "सिटी लिमोसीन'ने आर्थिक पुरस्कार दिल्यामुळे महिला हॉकीचे चित्र बदलेल, असेही ते म्हणाले.
----

No comments: