Sunday, August 12, 2007

Film Review of Chak De India

चित्रपट परिक्षण"

चक दे इंडीया' ः चुकवू नका, चकवू नका!

भारतात एकेकाळी हॉकीचे सुवर्णयुग होते आणि आजही हॉकी हाच भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ आहे, या दोन्ही गोष्टी, "एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघायचा,' याप्रमाणेच खऱ्या वाटत नाहीत. मात्र एकेकाळी खरोखरच हा देश हॉकीने का झपाटून गेला होता आणि यापुढेही जाऊ शकेल, हे "चक दे इंडीया' पाहिल्यावर पटल्यावाचून राहात नाही.

"यशराज फिल्म्स'सारखे प्रथीतयश बॅनर, आदित्य चोप्रासारखा अभ्यासू निर्माता, "अब तक छपन्न' हा आगळावेगळा चित्रपट दिलेला दिग्दर्शक आणि कारकिर्द भरात असतानाही वेगळ्या भूमिका करण्याचे धाडस दाखविणारा शाहरुख खानसारखा दमदार अभिनेता अशा "टीम'ने "चक दे' छान साकार केला आहे. विशेष म्हणजे हॉकीसारख्या "डब्यात गेलेल्या' विषयावर सर्वस्वी नवे चेहरे घेऊन त्यांनी काढलेला चित्रपट पाहिल्यावर "नशीब शूरांना साथ देते,' ही म्हण आठवते.

शाहरुख सोडल्यास या "चक दे'मध्ये "हिरॉईन' नाही, गाणे नाही, रोमान्स नाही, असे असूनही "चक दे' प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. हॉकीचे नाट्य पाहताना चित्रपटगृहात "पीन ड्रॉप सायलेन्स' असतो आणि सर्वांचे श्‍वास रोखले गेलेले असतात. "हॉकी में छक्के नही होते,' या शाहरुखच्या वाक्‍यावर "थिएटर' डोक्‍यावर घेतले जाते.खेळाडू म्हणून देशद्रोहाचा कलंक लागलेला एक हॉकीपटू नंतर प्रशिक्षक म्हणून देशाची शान उंचावतो. कबीर खान नामक हॉकीपटूची भूमिका साकारताना शाहरुखने आपल्या अभिनयाचे पैलू पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत.

"स्वदेस'द्वारे त्याने देशप्रेम असल्यास खेडेगावात कोणताही चमत्कार घडविता येतो, हा संदेश दिला होता. "चक दे' द्वारे महिला हॉकीच नव्हे तर सर्वच खेळांत भारत "महासत्ता' होऊ शकेल, हेच त्याला सुचवायचे आहे.

गटबाजी, स्वार्थ, वैयक्तिक यशाला प्राधान्य, संघभावनेचा अभाव, अशा "दुर्गुणां'नी ग्रासलेल्या 16 मुलींमध्ये शाहरूख परिवर्तन घडवितो आणि मग क्रांती होते. ह्याच मुली मातब्बर संघांना हरवून विश्‍वकरंडक जिंकतात, अशी "चक दे'ची स्टोरी आहे. यातलीच एक मुलगी क्रिकेट संघाच्या उपकर्णधाराला लग्नासाठी नकार देते. तिच्याप्रमाणेच प्रत्येक खेळाडूचे एक "कॅरॅक्‍टर' आहे आणि म्हणूनच "चक दे' पाहताना कंटाळा येतच नाही, उलट हॉकी सुद्धा "एंजॉय' केली जाते.शाहरुखचे कौतूक करताना या मुलींनाही शाबासकी द्यावी लागेल. त्यातही विद्या माळवदे व सागरीका घाटगे यांचा नामोल्लेख अटळ आहे.

महिला हॉकीत "दम' आहे, हा संदेश देतानाच महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत, मागे नाहीत, हे सुद्धा "चक दे' दाखवून देतो. म्हणूनच "चक दे'ला चुकवू नका, चकवू नका!
-----

1 comment:

ashishchandorkar said...

Good Film Review. You have good style of writing and you are also well informed in various fields. So keep it up and write on more and more subjects.