Sunday, August 12, 2007

article about Chak De India published in Sakal Papers, Pune on 13th July, 2007

होय, होय, हॉकीवर सिनेमा येतोय

मुकुंद पोतदार

हॉकीचे जादूगार' म्हणून नावारुपास आलेल्या मेजर ध्यानचंद यांचे सुवर्णयुग संपुष्टात आल्यानंतर भारतीय हॉकीची अधोगती झाली. अलिकडे तर हॉकीला चुकीच्या कारणांमुळेच प्रसिद्धी मिळत आहे. हॉकी आणि शोकांतिका हे भारतीय हॉकीच्या संदर्भात परस्परपूरक शब्द ठरले आहेत. अलिकडेच हॉकीला प्राधान्य खेळाच्या यादीतून वगळण्यात आले. अशावेळी हॉकीवर एक चित्रपट निघावा हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यातही आजघडीचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान याची यात मुख्य भूमिका असावी आणि हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली यश चोप्रा यांनी काढावा, ही माहिती कदाचित "एप्रिल फूल'चा प्रकार वाटू शकेल.

भारतीय हॉकीवर अजूनही विश्‍वास असलेले रसिक तर, "कशाला आमची चेष्टा करता,' असेही म्हणतील. मात्र हा कुणालाही चकविण्याचा प्रयत्न नाही. होय, होय, हॉकीवर पिक्‍चर निघतोय आणि त्याचे नाव आहे - "चक दे इंडीया'. हा चित्रपट दहा ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे."चक दे इंडीया' म्हणजे एका गोलरक्षकाची कथा आहे. ही कथा खरीखुरी आहे. चित्रपट अजूनही प्रदर्शित झाला नसल्यामुळे कथेबाबत गोपनीयता पाळली जात आहे.

मीररंजन नेगी नावाचा गोलरक्षक "झिरो' ते "हिरो' कसा झाला, हे हा चित्रपट दाखवितो. 1982च्या एशियाडमध्ये दिल्लीत भारताला परंपरागत प्रतीस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी नेगी गोलरक्षक होते. त्यांच्यावर "मॅचफिक्‍सिंग'चा आरोप झाला. तेव्हा हॉकी अत्यंत लोकप्रिय होती आणि पाकविरुद्ध पराभूत झाल्यामुळे नेगीसह तत्कालीन कर्णधार झफर इक्‍बाल याच्यासह सर्व हॉकीपटूंना "खलनायक' ठरविले गेले.

नेगी यांच्या कारकिर्दीवर आणि पर्यायाने आयुष्यावर कायमचा कलंक लागला. त्या पराभवानंतर कित्येक दिवस आपले हॉकीपटू केवळ रात्रीच बाहेर पडायचे, असे सांगितले जाते. त्या सामन्याला तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी आणि तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे हॉकीपटूंवर दडपण आले, मात्र देशाच्या प्रथम नागरीकासह हॉकीपटूंना संपूर्ण देशाची घोर निराशा केली.या पराभवानंतर नेगी "खलनायक' ठरले.

मात्र याच नेगी यांना नंतर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2002च्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले. या कामगिरीमुळे नेगी एका रात्रीत "हिरो' झाले. नेगी यांची कारकिर्द म्हणजे शोकांतिका आणि सुखांतिका अशा दोन्हींचे मिश्रण आहे. "अब तक छपन्न' हा वेगळा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या शिमीत अमीन यांनीच या चित्रपटाची ही जबाबदारी सांभाळली आहे.नेगी यांची भूमिका शाहरुखने केली आहे. या चित्रपटात तो मुस्लीम असून त्याला दाढीही आहे, अशी माहिती आहे. हॉकी वर्तुळात तरी या चित्रपटाविषयी आश्‍चर्य आणि अर्थातच आनंदही व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटाचा जागतिक प्रिमीअर लंडनमध्ये होणार आहे.बॉलीवूडमध्ये बहुतेक चित्रपट बॉक्‍स ऑफीसवर डोळा ठेवून केले जातात. अशावेळी हॉकीसारख्या "डब्यात गेलेल्या' विषयावर चित्रपट निघणे व त्यात शाहरुख असणे हा "चमत्कार'च ठरावा. हा चित्रपट यशस्वी ठरणार का आणि त्यामुळे भारतीय हॉकीला लोकप्रियता व संजीवनी मिळणार का? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र काळच देईल.
----

No comments: