Friday, January 9, 2009

ब्लॉग'चालकांचे "कमबॅक'

ब्लॉग'चालकांचे "कमबॅक'


आज, बऱ्याच दिवसांनी स्वतःच्याच ब्लॉगकडे लक्ष दिले आहे. इतके दिवस जणू काही ढुंकूनही पाहिले नव्हते. जणू काही कशाला? खरे तर नाहीच!सहा जानेवारी रोजी पाने लावण्याच्या (वृत्तपत्रांची तुम्ही वाचता त्या पानांची रचना संगणकावर तयार करणे) गडबडीत असतानाच राजेश ओझा याचा फोन आला. राजेशची बोलण्याची एक जबरदस्त शैली आहे. आम्ही पत्रकार मंडळी "शुद्ध' बोलतो, असे कौतूक नेहमी ऐकायची सवय होऊन गेली आहे. मात्र राजेशचे बोलणे पत्रकारच नव्हे तर साहित्यीकांनाही लाजवणारे असते. राजस्थानी असूनही त्याने शुद्ध मराठीत लग्नाचे आमंत्रण दिले. मुलीचे नाव "भारती सासवडकर' असल्याचे तो म्हणाला.


गुप्ते मंगल कार्यालय हे आमच्या घराच्या जवळच असलेले केसरीवाड्यासमोरील कार्यालय तसे पाहिले तर आम्हा क्रीडा पत्रकारांसाठी "बुद्धिबळ स्पर्धांच्या आयोजनाचे ठिकाण' म्हणून प्रसिद्ध आहे. "काय योगायोग म्हणायचा. बुद्धिबळपटूचे लग्न त्याच्याच खेळाच्या स्पर्धा होतात, त्याच ठिकाणी,' असा विचार फोन सुरू असतानाच मनात आला. पुन्हा एकदा राजेशचे अभिनंदन केले आणि नक्की येतो, असे "प्रॉमिस' करीत त्याला शुभेच्छाही दिल्या.


वृत्तपत्रात संध्याकाळी पाने लावण्याची वेळ भयंकर (!) असते. राजेशचे अभिनंदन केले आणि मोबाईल बंद केला. कामाची भीषण (!) वेळ असूनही आधी राजेशचा नंबर सेव्ह केला. (अलिकडेच दुसरा मोबाईल हॅंडसेट हरविल्यामुळे असे फोन येत जातात, तसे नंबर सेव्ह करीत जात असतो...) नंबर सेव्ह केल्यावर "रिमाईंडर' सुद्धा लावले. नऊ तारखेचे लग्न चुकवून चालणार नव्हते.ंनंतर काम करून, घरी जाऊन, जेवण करून झोपलो सुद्धा!!!! सकाळी उठल्यावर बायकोला सांगितले की, नऊ तारखेला सकाळी मी जेवायला नसेन. एक लग्न आहे.


तोपर्यंत सुद्धा ट्यूब पेटली नव्हती. मात्र अचानक माझ्यातील पत्रकार जागा झाला. मी विचार केला, अरे हा राजेश तर दृष्टिहीन आहे. याच्याशी कोण मुलगी लग्नाला तयार झाली? असा प्रश्‍न पडला. मी म्हटले तो दृष्टिहीन असल्यामुळे मुलगी सुद्धा दृष्टिहीनच असेल. तरि सुद्धा उत्सुकता होती. मात्र थेट त्याला कसे विचारायचे, हा प्रश्‍न होता.


त्यामुळे मी त्याचे प्रशिक्षक जोसेफ डीसुझा यांना फोन केला.जोसेफ यांच्याशी बोलताना मग मला "बातमी' कळली. त्यांनी सांगितले की, भारतीचे वडील अंध होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. भारती त्यांच्या स्मरणार्थ अंध बुद्धिबळ खेळाडूंची स्पर्धा आयोजित करीत असते. लगेच त्यांच्याकडून भारतीचा नंबर घेतला. भारतीशी बोललो आणि मग त्यातूनच ही बातमी तयार झाली.


क्रीडा पत्रकार असूनही मी काही वेगळ्या विषयांवर लिहीले आहे किंबहुना योगायोगाने तसे लिहीण्याची संधी मिळाली. याविषयी पुन्हा केव्हा तरी...अरे नाही, नाही, केव्हा तरी नाही, आता नियमीतपणे "ब्लॉग चालक-मालक-मुद्रक-प्रकाशक-संस्थापक' हे पद (की पदावळी) सार्थ ठरविण्याचा संकल्प केला आहे. (याचा आणि नव्याने सुरू झालेल्या 2009चा काहीही संबंध नाही, याची नोंद घ्यावी!!!!)




"डोळस' विवाहदृष्टिहीन तरुणाला निवडले जीवनाचा साथीदारभारतीचा निर्णय : येत्या शुक्रवारी पुण्यात विवाहबद्ध होणार मुकुंद पोतदार : सकाळ वृत्तसेवापुणे, ता. 7 ः "तो' एक दृष्टिहीन... आणि "ती' चांगली डोळस...; मात्र "दृष्टी' चारचौघांहून वेगळी. दृष्टिहिनांसाठी काम करणाऱ्या वडिलांचा वारसा अंगात भिनलेला. त्यामुळे दृष्टिहीनता हे वैगुण्य न समजता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेश ओझाच्या "ती' प्रेमात पडली. राजेशचा स्वाभिमान तिला भावला आणि त्याच्याशी जन्माची सोबत करण्याचा निर्णय तिने घेतला. आता 9 जानेवारीला ते विवाहबद्ध होत आहेत. पुण्याच्या भारती सासवडकरची ही कहाणी...भारतीचे वडील सखाराम सासवडकर "एसकेएफ'मध्ये नोकरी करायचे. दृष्टिहीन असूनही, ते फार सक्रिय असायचे. त्यांनी दृष्टिहीन कलाकारांचा वाद्यवृंद सुरू केला होता. त्यानिमित्त सासवडकरांच्या घरी दृष्टिहीन कलाकार, अन्य दृष्टिहिनांचे येणे-जाणे होते. त्यांची जिद्द पाहतच भारती मोठी झाली. त्यांच्यासाठी चाललेल्या कार्यातही सहभागी होऊ लागली. सखाराम बुद्धिबळ स्पर्धांत भाग घ्यायचे. त्यांचे 2001 मध्ये हृदयविकारामुळे निधन झाले. भारतीसाठी हा मोठाच धक्का होता; मात्र वडिलांचे छत्र हरपले, तरी त्यांचे कार्य थांबू द्यायचे नाही, हा निर्धार तिने केला. दुसरीकडे ती कायद्याचे शिक्षणही घेत होती. 2002 मध्ये तिने वडिलांच्या स्मृत्यर्थ दृष्टिहिनांची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली. त्यात राजेश सहभागी झाला. राजेशबरोबर अशा प्रकारे झालेली ओळख वाढली आणि ती त्याच्या प्रेमात पडली.राजेशविषयी ती सांगते, ""तो दृष्टिहीन असला, तरी स्वाभिमानी आहे; उपकार म्हणून केलेली मदत तो स्वीकारत नाही. अनेकांनी नोकरीचे आश्‍वासन देऊन तोंडाला पाने पुसली, तरी तो हात-पाय गाळून बसला नाही. त्याने स्वतः बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्याचा हा गुण मला आवडला.'' राजेशला वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत दिसत होते; मात्र मोतीबिंदूचा त्रास झाला. परिणामी त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. लहान वयात नेत्रपटल नाजूक असल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. आधी एक आणि मग दीड वर्षाने दुसरा असे दोन्ही डोळे गमावल्यामुळे राजेशवर आकाश कोसळले. त्याचे वडील मफतलालसुद्धा खचून गेले; मात्र एके दिवशी वृत्तपत्रात त्यांनी नाशिकमधील दृष्टिहिनांच्या बुद्धिबळ स्पर्धेची बातमी वाचली. ते राजेशला म्हणाले, ""बघ, दृष्टिहीन मुले बुद्धिबळ खेळू शकतात. आपण करायचा का प्रयत्न?'' "इच्छा तेथे मार्ग' या उक्तीची मफतलाल यांना प्रचिती आली. त्यांच्याच सोमवार पेठ भागात राहणारे बुद्धिबळाचे प्रशिक्षक जोसेफ डिसूझा यांचे नाव त्यांना कळले. डिसूझा यांनी राजेशला हा खेळ शिकविण्याचे आव्हान स्वीकारले. तेव्हा डोळस मुलांचा प्रशिक्षण वर्ग जोरात चालत असतानाही त्यांनी राजेशला दाखल करून घेतले.राजेशने कारकिर्दीत आतापर्यंत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घेतला आहे. पुरस्कर्त्यांच्या मदतीशिवाय त्याने कारकीर्द केली. दृष्टिहीन आणि यश मिळविलेला खेळाडू अशा निकषांवर त्याला नोकरीची आशा होती; मात्र याविषयी कटू अनुभव आल्यामुळे त्याने स्वतः प्रशिक्षण वर्ग सुरू केला. सोमवार पेठ, वानवडी आणि हडपसर अशा ठिकाणी तो शिकवितो. त्याला तेथे गाडीवरून नेण्या-आणण्याबरोबरच क्‍लास चालविण्यातही भारती त्याला मदत करते.

Tuesday, August 21, 2007

"चक दे' ची चर्चा!

"चक दे' ची चर्चा!"चक दे इंडिया' पाहिल्यानंतर मी बऱ्याच परिचित मंडळींना "एसएमएस' केला. "चक दे इंडिया' जरूर पाहा. पोराबाळांनाही घेऊन जा, असा हा "एसएमएस' होता. विशेष म्हणजे "एसएमएस' "सेंड टू मेनी' या ऑप्शनमधून पाठवित असतानाच काही जणांचे रिप्लाय आले.

यात "ओके,' "थॅंक्‍स', "नक्की बघतो,' असा प्रतिसाद होता. यावरून या चित्रपटाविषयी उत्सुकता होती, हे जाणवले.ज्या मंडळींना "एसएमएस' पाठविले, त्यातील बऱ्याच जणांनी "चक दे' पाहिला. पाहिलेल्यांचा प्रतिसादही मिळत आहे. माझ्या पी. डी. देशमुख नावाच्या मित्राने तर सिनेमा सुरू असताना इंटर्व्हल व्हायच्या आधीच "chak de pahtoy..keval chan! असा "एसएमएस' पाठविला. राहूल जोशी नावाच्या मित्राने तर इंटर्व्हलमध्ये बाहेर आल्यानंतर थेट फोन केला. "मुकुंद, अरे फार मस्त आहे सिनेमा. मी एकटा पाहतोय. पण शक्‍य झाल्यास आजच रात्री घरच्या सगळ्यांना घेऊन पुन्हा पाहणार आहे.' जयंत महाबोले यानेही "चक दे' आवडल्याचे एसएमएस द्वारे कळविले.या सिनेमाचे परिक्षण मी "सकाळ'मध्ये लिहीले आहे. आमचा प्रुफरिडर असित हा त्याचा पहिला वाचक. या बहाद्दराने परिक्षण वाचले, त्याला आवडले, त्याने तिकीट काढले, त्याने सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून त्यानेच मला हे सांगितले की, तुझे परिक्षण वाचूनच मी "चक दे' पाहायचे ठरविले!

हेच परिक्षण वाचून आशिष चांदोरकर हा आमचा हॉकीप्रेमी सहकारी सुद्धा "चक दे' पाहणार आहे. त्याच्या रिस्पॉन्सची मला प्रतिक्षा आहे.

तसे पाहिले तर प्रत्यक्ष "चक दे'चा पहून पहिला "रीस्पॉन्स' "मामू' उर्फ श्रीपाद ब्रह्मेकडून आला. परिक्षण द्यायचे नसले तरी त्याने स्वखर्चाने तिकीट काढून "फर्स्ट डे फर्स्ट शो'ला "चक दे' पाहिला. तो सुद्धा भारावून गेला होता.एकंदरीत "चक दे'ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा चित्रपट यापुढेही गाजेल, याचे कारण "माऊथ पब्लीसीटी'! आता "चक दे' ऑस्करसाठी जावा आणि इतकेच नव्हे तर त्याला "ऑस्कर'ही मिळावे, हीच सदिच्छा!

Sunday, August 12, 2007

Second Best Thing In Indian Hockey!

I won't forget the day Friday, 10 Aug. 2007. I watched the movie `Chak De India'. 1st day! 1st show!! I was experiencing this `1st' thing for the very 1st time in my life!

Now I can tell u that it is a very very good movie. In fact I am very proud that I watched `Chak De' on 1st day, 1st show!! King Khan has done a tremendous job. Actyally this film will be termed as a major milestone for Shahrukh. For the other actors i.e. all the players this will be a stepping-stone. And what a tremendous start they have got! Banner is Yashraj Films. Producer is Aditya Chopra. Director is Shimit Amin. What more they can ask?

Whole film is thrilling. Here we have to take into account that `Chak De' is based on Hockey. Hockey? yeah..Hockey, Our Official National Game, the game which gave us the Magician named Major Dhyanchand. This is the same game which brought Olympic Glory.

But sadly all changed & hockey lost it's glory, glamour. In such a situation `Chak De' has come. I think after Major Dhyanchand, whose birth-day 29th August is celebrated as Sports Day, `Chak De' is the second best thing to have happend to Indian Hockey.

News Published in Sakal on 11th August, 2007

चक दे'फेम मुलींचा
खऱ्या खेळाडूंशी सामना!

मुंबई, ता. 10 (पीटीआय) ः "चक दे इंडिया' चित्रपटात महिला हॉकीपटूंची भूमिका केलेल्या मुली आणि भारताच्या खऱ्याखुऱ्या महिला हॉकी संघातील खेळाडू यांच्यात एक प्रदर्शनी सामना आयोजित करण्याचा विचार असल्याचे भारताचे माजी गोलरक्षक मीररंजन नेगी यांनी सांगितले.त्यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेला "चक दे' आज प्रदर्शित झाला.

चित्रपटात मुख्य भूमिका असलेला शाहरुख खान, तसेच महिला हॉकीपटूंची भूमिका केलेल्या मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले. याविषयी ते म्हणाले की, ""लवकरच असा सामना घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी कलाकारांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली तेव्हा त्यांना हॉकीविषयीच नव्हे तर मैदानावर साधे धावण्याविषयीसुद्धा कल्पना नव्हती. मात्र "चक दे' पाहिल्यानंतर या मुलींनी हॉकी किती छान आत्मसात केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यांनी हा चमत्कार कसा केला याचे आश्‍चर्य वाटते. या मुली हॉकी खरोखरच चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या मुली आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना नक्कीच चांगली लढत देऊ शकतील. प्रदर्शनी सामन्यातही त्यांना मान खाली घालावी लागणार नाही. त्यामुळेच मी हा सामना आयोजित करण्यासाठी गांभीर्याने विचार करतो आहे.'

मुलींच्या संघाने पुरुष संघाविरुद्ध सामना खेळल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील मुली मणीपूर, दिल्ली, पंजाब, उत्तरांचल, महाराष्ट्र, अशा ठिकाणी राहणाऱ्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच खऱ्या खेळाडूंना सवलती मिळतील आणि हॉकीत पुन्हा यशोमालिका सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "सिटी लिमोसीन'ने आर्थिक पुरस्कार दिल्यामुळे महिला हॉकीचे चित्र बदलेल, असेही ते म्हणाले.
----

News Published in Sakal on 9th August, 2007

"चक दे इंडिया'चा आज
लंडनमध्ये प्रीमिअर

लंडन, ता. 8 (पीटीआय) ः लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेल्या "चक दे इंडिया' या बहुचर्चित चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर उद्या येथील सॉमरसेट हाउसमध्ये होत आहे. भारताचे माजी गोलरक्षक मीररंजन नेगी यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

शाहरुखच्या जोडीला विद्या माळवदे ही अभिनेत्री चित्रपटात झळकत आहे. शिमीत अमीन दिग्दर्शक, तर आदित्य चोप्रा निर्माते आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन या शहरांत चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.

"प्रीमिअर'ला सुमारे दोन हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर लंडनमध्ये होत असल्याबद्दल लंडनचे महापौर केन लिव्हिंगस्टोन यांनी आनंद व्यक्त केला.
-----

Interview of Negi on the day of release of `Chak De India'

शाहरुखमुळे मुलांच्या हाती
पुन्हा हॉकी स्टिक दिसतील ः नेगी

मुकुंद पोतदार

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 9 ः ""शाहरुख खान आजघडीचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्यामुळे हॉकीचे सुवर्णवैभव पुन्हा निर्माण होण्यास नक्कीच चालना मिळेल,'' अशी भावना भारताचे माजी गोलरक्षक आणि महिला संघाचे माजी प्रशिक्षक मीररंजन नेगी यांनी व्यक्त केली. "अगर शाहरुख हॉकी का स्टिक अपने हात में पकडें, तो सारे देश के बच्चे फिरसे हॉकी जरूर खेलने लगेंगे,' अशी उत्स्फूर्त भावनाही त्यांनी व्यक्त केली.

शाहरुखची मुख्य भूमिका असलेला "चक दे इंडिया' हा चित्रपट उद्या देशभर प्रदर्शित होत आहे. नेगी यांच्या कारकिर्दीवर आधारित या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यानिमित्त संपर्क साधला असता ते म्हणाले, ""माझी कारकीर्द संपली आहे. मला पुन्हा "इनिंग' खेळता येणार नाही; पण माझ्या खेळाची "इनिंग' पुन्हा सुरू झाली पाहिजे. चित्रपटसृष्टीत जाणे हे माझे स्वप्न कधीच नव्हते. मात्र, चित्रपटासारखे प्रभावी माध्यम हॉकीला मिळाल्यास आमच्या खेळाला पुन्हा सोनेरी दिवस येतील. यामुळेच मी "यशराज फिल्म्स'च्या या प्रकल्पात सहभागी झालो. हॉकीचे पुनरुज्जीवन करण्याचाच आमचा प्रयत्न आहे. "चक दे'मुळे हॉकीला थोडीशी चालना मिळाली, तरी खूप काही साध्य होईल.''

"यशराज', निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक शिमित अमीन यांच्याविषयी नेगी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

---चौकट

असा आहे "चक दे...'

1982 मधील दिल्ली एशियाडमध्ये नेगी भारतीय संघाचे गोलरक्षक होते. अंतिम फेरीत भारताचा पाकिस्तानविरुद्ध 1-7 असा पराभव झाला. या दारुण पराभवानंतर नेगी यांच्यावर "मॅच-फिक्‍सिंग'चा आरोप झाला. त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. यामुळे त्यांच्या कारकिर्दीला व प्रतिमेला डाग लागला. मात्र, याच नेगींनी 2002 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून भारतीय महिला संघाला सुवर्णपदक जिंकून दिले.


---

article about Chak De India published in Sakal Papers, Pune on 13th July, 2007

होय, होय, हॉकीवर सिनेमा येतोय

मुकुंद पोतदार

हॉकीचे जादूगार' म्हणून नावारुपास आलेल्या मेजर ध्यानचंद यांचे सुवर्णयुग संपुष्टात आल्यानंतर भारतीय हॉकीची अधोगती झाली. अलिकडे तर हॉकीला चुकीच्या कारणांमुळेच प्रसिद्धी मिळत आहे. हॉकी आणि शोकांतिका हे भारतीय हॉकीच्या संदर्भात परस्परपूरक शब्द ठरले आहेत. अलिकडेच हॉकीला प्राधान्य खेळाच्या यादीतून वगळण्यात आले. अशावेळी हॉकीवर एक चित्रपट निघावा हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यातही आजघडीचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान याची यात मुख्य भूमिका असावी आणि हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली यश चोप्रा यांनी काढावा, ही माहिती कदाचित "एप्रिल फूल'चा प्रकार वाटू शकेल.

भारतीय हॉकीवर अजूनही विश्‍वास असलेले रसिक तर, "कशाला आमची चेष्टा करता,' असेही म्हणतील. मात्र हा कुणालाही चकविण्याचा प्रयत्न नाही. होय, होय, हॉकीवर पिक्‍चर निघतोय आणि त्याचे नाव आहे - "चक दे इंडीया'. हा चित्रपट दहा ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे."चक दे इंडीया' म्हणजे एका गोलरक्षकाची कथा आहे. ही कथा खरीखुरी आहे. चित्रपट अजूनही प्रदर्शित झाला नसल्यामुळे कथेबाबत गोपनीयता पाळली जात आहे.

मीररंजन नेगी नावाचा गोलरक्षक "झिरो' ते "हिरो' कसा झाला, हे हा चित्रपट दाखवितो. 1982च्या एशियाडमध्ये दिल्लीत भारताला परंपरागत प्रतीस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी नेगी गोलरक्षक होते. त्यांच्यावर "मॅचफिक्‍सिंग'चा आरोप झाला. तेव्हा हॉकी अत्यंत लोकप्रिय होती आणि पाकविरुद्ध पराभूत झाल्यामुळे नेगीसह तत्कालीन कर्णधार झफर इक्‍बाल याच्यासह सर्व हॉकीपटूंना "खलनायक' ठरविले गेले.

नेगी यांच्या कारकिर्दीवर आणि पर्यायाने आयुष्यावर कायमचा कलंक लागला. त्या पराभवानंतर कित्येक दिवस आपले हॉकीपटू केवळ रात्रीच बाहेर पडायचे, असे सांगितले जाते. त्या सामन्याला तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी आणि तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे हॉकीपटूंवर दडपण आले, मात्र देशाच्या प्रथम नागरीकासह हॉकीपटूंना संपूर्ण देशाची घोर निराशा केली.या पराभवानंतर नेगी "खलनायक' ठरले.

मात्र याच नेगी यांना नंतर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2002च्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले. या कामगिरीमुळे नेगी एका रात्रीत "हिरो' झाले. नेगी यांची कारकिर्द म्हणजे शोकांतिका आणि सुखांतिका अशा दोन्हींचे मिश्रण आहे. "अब तक छपन्न' हा वेगळा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या शिमीत अमीन यांनीच या चित्रपटाची ही जबाबदारी सांभाळली आहे.नेगी यांची भूमिका शाहरुखने केली आहे. या चित्रपटात तो मुस्लीम असून त्याला दाढीही आहे, अशी माहिती आहे. हॉकी वर्तुळात तरी या चित्रपटाविषयी आश्‍चर्य आणि अर्थातच आनंदही व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटाचा जागतिक प्रिमीअर लंडनमध्ये होणार आहे.बॉलीवूडमध्ये बहुतेक चित्रपट बॉक्‍स ऑफीसवर डोळा ठेवून केले जातात. अशावेळी हॉकीसारख्या "डब्यात गेलेल्या' विषयावर चित्रपट निघणे व त्यात शाहरुख असणे हा "चमत्कार'च ठरावा. हा चित्रपट यशस्वी ठरणार का आणि त्यामुळे भारतीय हॉकीला लोकप्रियता व संजीवनी मिळणार का? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र काळच देईल.
----