Friday, January 9, 2009

ब्लॉग'चालकांचे "कमबॅक'

ब्लॉग'चालकांचे "कमबॅक'


आज, बऱ्याच दिवसांनी स्वतःच्याच ब्लॉगकडे लक्ष दिले आहे. इतके दिवस जणू काही ढुंकूनही पाहिले नव्हते. जणू काही कशाला? खरे तर नाहीच!सहा जानेवारी रोजी पाने लावण्याच्या (वृत्तपत्रांची तुम्ही वाचता त्या पानांची रचना संगणकावर तयार करणे) गडबडीत असतानाच राजेश ओझा याचा फोन आला. राजेशची बोलण्याची एक जबरदस्त शैली आहे. आम्ही पत्रकार मंडळी "शुद्ध' बोलतो, असे कौतूक नेहमी ऐकायची सवय होऊन गेली आहे. मात्र राजेशचे बोलणे पत्रकारच नव्हे तर साहित्यीकांनाही लाजवणारे असते. राजस्थानी असूनही त्याने शुद्ध मराठीत लग्नाचे आमंत्रण दिले. मुलीचे नाव "भारती सासवडकर' असल्याचे तो म्हणाला.


गुप्ते मंगल कार्यालय हे आमच्या घराच्या जवळच असलेले केसरीवाड्यासमोरील कार्यालय तसे पाहिले तर आम्हा क्रीडा पत्रकारांसाठी "बुद्धिबळ स्पर्धांच्या आयोजनाचे ठिकाण' म्हणून प्रसिद्ध आहे. "काय योगायोग म्हणायचा. बुद्धिबळपटूचे लग्न त्याच्याच खेळाच्या स्पर्धा होतात, त्याच ठिकाणी,' असा विचार फोन सुरू असतानाच मनात आला. पुन्हा एकदा राजेशचे अभिनंदन केले आणि नक्की येतो, असे "प्रॉमिस' करीत त्याला शुभेच्छाही दिल्या.


वृत्तपत्रात संध्याकाळी पाने लावण्याची वेळ भयंकर (!) असते. राजेशचे अभिनंदन केले आणि मोबाईल बंद केला. कामाची भीषण (!) वेळ असूनही आधी राजेशचा नंबर सेव्ह केला. (अलिकडेच दुसरा मोबाईल हॅंडसेट हरविल्यामुळे असे फोन येत जातात, तसे नंबर सेव्ह करीत जात असतो...) नंबर सेव्ह केल्यावर "रिमाईंडर' सुद्धा लावले. नऊ तारखेचे लग्न चुकवून चालणार नव्हते.ंनंतर काम करून, घरी जाऊन, जेवण करून झोपलो सुद्धा!!!! सकाळी उठल्यावर बायकोला सांगितले की, नऊ तारखेला सकाळी मी जेवायला नसेन. एक लग्न आहे.


तोपर्यंत सुद्धा ट्यूब पेटली नव्हती. मात्र अचानक माझ्यातील पत्रकार जागा झाला. मी विचार केला, अरे हा राजेश तर दृष्टिहीन आहे. याच्याशी कोण मुलगी लग्नाला तयार झाली? असा प्रश्‍न पडला. मी म्हटले तो दृष्टिहीन असल्यामुळे मुलगी सुद्धा दृष्टिहीनच असेल. तरि सुद्धा उत्सुकता होती. मात्र थेट त्याला कसे विचारायचे, हा प्रश्‍न होता.


त्यामुळे मी त्याचे प्रशिक्षक जोसेफ डीसुझा यांना फोन केला.जोसेफ यांच्याशी बोलताना मग मला "बातमी' कळली. त्यांनी सांगितले की, भारतीचे वडील अंध होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. भारती त्यांच्या स्मरणार्थ अंध बुद्धिबळ खेळाडूंची स्पर्धा आयोजित करीत असते. लगेच त्यांच्याकडून भारतीचा नंबर घेतला. भारतीशी बोललो आणि मग त्यातूनच ही बातमी तयार झाली.


क्रीडा पत्रकार असूनही मी काही वेगळ्या विषयांवर लिहीले आहे किंबहुना योगायोगाने तसे लिहीण्याची संधी मिळाली. याविषयी पुन्हा केव्हा तरी...अरे नाही, नाही, केव्हा तरी नाही, आता नियमीतपणे "ब्लॉग चालक-मालक-मुद्रक-प्रकाशक-संस्थापक' हे पद (की पदावळी) सार्थ ठरविण्याचा संकल्प केला आहे. (याचा आणि नव्याने सुरू झालेल्या 2009चा काहीही संबंध नाही, याची नोंद घ्यावी!!!!)




"डोळस' विवाहदृष्टिहीन तरुणाला निवडले जीवनाचा साथीदारभारतीचा निर्णय : येत्या शुक्रवारी पुण्यात विवाहबद्ध होणार मुकुंद पोतदार : सकाळ वृत्तसेवापुणे, ता. 7 ः "तो' एक दृष्टिहीन... आणि "ती' चांगली डोळस...; मात्र "दृष्टी' चारचौघांहून वेगळी. दृष्टिहिनांसाठी काम करणाऱ्या वडिलांचा वारसा अंगात भिनलेला. त्यामुळे दृष्टिहीनता हे वैगुण्य न समजता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेश ओझाच्या "ती' प्रेमात पडली. राजेशचा स्वाभिमान तिला भावला आणि त्याच्याशी जन्माची सोबत करण्याचा निर्णय तिने घेतला. आता 9 जानेवारीला ते विवाहबद्ध होत आहेत. पुण्याच्या भारती सासवडकरची ही कहाणी...भारतीचे वडील सखाराम सासवडकर "एसकेएफ'मध्ये नोकरी करायचे. दृष्टिहीन असूनही, ते फार सक्रिय असायचे. त्यांनी दृष्टिहीन कलाकारांचा वाद्यवृंद सुरू केला होता. त्यानिमित्त सासवडकरांच्या घरी दृष्टिहीन कलाकार, अन्य दृष्टिहिनांचे येणे-जाणे होते. त्यांची जिद्द पाहतच भारती मोठी झाली. त्यांच्यासाठी चाललेल्या कार्यातही सहभागी होऊ लागली. सखाराम बुद्धिबळ स्पर्धांत भाग घ्यायचे. त्यांचे 2001 मध्ये हृदयविकारामुळे निधन झाले. भारतीसाठी हा मोठाच धक्का होता; मात्र वडिलांचे छत्र हरपले, तरी त्यांचे कार्य थांबू द्यायचे नाही, हा निर्धार तिने केला. दुसरीकडे ती कायद्याचे शिक्षणही घेत होती. 2002 मध्ये तिने वडिलांच्या स्मृत्यर्थ दृष्टिहिनांची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली. त्यात राजेश सहभागी झाला. राजेशबरोबर अशा प्रकारे झालेली ओळख वाढली आणि ती त्याच्या प्रेमात पडली.राजेशविषयी ती सांगते, ""तो दृष्टिहीन असला, तरी स्वाभिमानी आहे; उपकार म्हणून केलेली मदत तो स्वीकारत नाही. अनेकांनी नोकरीचे आश्‍वासन देऊन तोंडाला पाने पुसली, तरी तो हात-पाय गाळून बसला नाही. त्याने स्वतः बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्याचा हा गुण मला आवडला.'' राजेशला वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत दिसत होते; मात्र मोतीबिंदूचा त्रास झाला. परिणामी त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. लहान वयात नेत्रपटल नाजूक असल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. आधी एक आणि मग दीड वर्षाने दुसरा असे दोन्ही डोळे गमावल्यामुळे राजेशवर आकाश कोसळले. त्याचे वडील मफतलालसुद्धा खचून गेले; मात्र एके दिवशी वृत्तपत्रात त्यांनी नाशिकमधील दृष्टिहिनांच्या बुद्धिबळ स्पर्धेची बातमी वाचली. ते राजेशला म्हणाले, ""बघ, दृष्टिहीन मुले बुद्धिबळ खेळू शकतात. आपण करायचा का प्रयत्न?'' "इच्छा तेथे मार्ग' या उक्तीची मफतलाल यांना प्रचिती आली. त्यांच्याच सोमवार पेठ भागात राहणारे बुद्धिबळाचे प्रशिक्षक जोसेफ डिसूझा यांचे नाव त्यांना कळले. डिसूझा यांनी राजेशला हा खेळ शिकविण्याचे आव्हान स्वीकारले. तेव्हा डोळस मुलांचा प्रशिक्षण वर्ग जोरात चालत असतानाही त्यांनी राजेशला दाखल करून घेतले.राजेशने कारकिर्दीत आतापर्यंत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घेतला आहे. पुरस्कर्त्यांच्या मदतीशिवाय त्याने कारकीर्द केली. दृष्टिहीन आणि यश मिळविलेला खेळाडू अशा निकषांवर त्याला नोकरीची आशा होती; मात्र याविषयी कटू अनुभव आल्यामुळे त्याने स्वतः प्रशिक्षण वर्ग सुरू केला. सोमवार पेठ, वानवडी आणि हडपसर अशा ठिकाणी तो शिकवितो. त्याला तेथे गाडीवरून नेण्या-आणण्याबरोबरच क्‍लास चालविण्यातही भारती त्याला मदत करते.